मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपकडे येणा-या महामंडळांवरील नियुक्त्यांना ग्रीन सिग्नल दिला असला तरी शिवसेनेने मुंबईतील आर्थिकदृष्टय़ा सक्षम महामंडळांवर दावा सांगितल्याने अंतिम निर्णय लांबणीवर पडल्याची चर्चा आहे.पुढील आठवड्यात होणा-या दोन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येते.शिवसेना व भाजपमध्ये महामंडळांचे वाटप कसे असावे यावरून टोकाचा संघर्ष सुरू होता. याबाबत दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये अनेकवेळा बैठका झाल्या. मुंबईतील महत्त्वाच्या व आर्थिकदृष्टय़ा सक्षम असलेल्या महा मंडळांवर शिवसेनेने दावा केला. यामध्ये म्हाडा, इमारत दुरुस्ती व देखभाल यांचा समावेश आहे. याशिवाय इतर आर्थिक व सामाजिक महामंडळांचे वाटप करतानाही दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा सुरू होती. अखेर भारतीय जनता पक्षाला हव्या असलेल्या प्रमुख महामंडळांवरील सदस्यांच्या नेमणुकीची छाननी करून अंतिम निवड करण्यात आल्याचे समजते. शिवसेनेला हव्या असलेल्या मुंबईतील महामंडळांबाबत मात्र अद्याप अंतिम निर्णय झाला नसून, या वेळीही शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे सूत्रांचे मत आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews